Wednesday, December 30, 2015

नुकत्याच पार पडलेल्या दत्तजयंतीच्या निमित्ताने ...



आज 'हिंदू' धर्मावर टीका करणारे, नव्हे गरळ ओकणारे, अनेक आहेत. खासकरून ‘आमच्या’ आनंदाच्या क्षणी, सणासमारंभाच्या वेळी अशा हिंदू विरोधी, देवदेवता विरोधी आशयाच्या संदेशांना सोशल मिडीयावर उत येतो, हिंदू द्वेषाच्या ओकाऱ्या सुरु होतात. हिंदूंचे देव असेच आहेत, तसेच आहेत, या प्रथा चुकीच्या आहेत, त्या प्रथा चुकीच्या आहेत, या अंधश्रद्धा आहेत, यावर मुतायला हवं, त्यावर मुतायला हवं वगैरे! मजेशीर गोष्ट म्हणजे २० वर्षांपूर्वी जेव्हा दूरदर्शन वर रामायण-महाभारत लागायचं तेव्हा हेच सर्व लोक, या मालिका अतिशय चवीने पहायचे...या मालिका सुरु झाल्या रे झाल्या, की हातातली काम टाकून सर्व लोक टीवी समोर बसायचे...रस्ते ओस पडायचे...


हिंदूधर्म ही आज सर्वमान्य संज्ञा असली तरीही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, हिंदू हा धर्म नसून, जीवनपद्धती आहे. हिंदू धर्म अमुक व्यक्तीने स्थापन केला असे कुठेही पुरावे आढळत नाहीत. 'हिंदू' जीवन पद्धती संगणकातल्या Operating System सारखी आहे. त्यात सतत कालानुरूप सुधारणा आणि दुरुस्त्या होत असतात. (अपडेट्स आणि फिक्सेस), या अपडेट्स म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, आपले समाज सुधारक आहेत, आपले महापुरुष जे आपल्या विचारांनी समाजाचं प्रबोधन करत असतात. ज्ञानी तसेच सर्वंकष विचार करून सुधारणा सुचवणाऱ्या समाजसुधारकांचे आम्ही स्वागतच करतो, परंतु कुणीही उठावे आणि हिंदूंना अक्कल शिकवायला यावे, हिंदू देवतांवर अभद्र टीका कराव्यात, प्रत्येक हिंदू प्रथेवर ताशेरे ओढावे, अशा लोकांकडून सुधारणाच काय परंतु आम्ही अशा लोकांच्या वाऱ्याला देखील उभे राहत नाही. संगणकीय भाषेत बोलायचे झाल्यास, We download updates from trusted sources!!! त्यामुळे हिंदू धर्मावर जेवढी जास्त टीका होईल तेवढा हा धर्म अधिकाधिक भट्टीतून निघालेल्या सोन्यासारखा उजळून निघेल यात शंका नाही.


याच हिंदू धर्माचे संस्कार होऊन, अनेक थोर राजे-महाराजे, संत-महंत, कवी-साहित्यिक-कलाकार, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी घडले. ज्या हिंदू धर्माचेच संस्कार होऊन शिवाजी महाराज घडले, श्रीराम, श्रीकृष्णाच्या कथा ऐकत लहानाचे मोठे झाले, [सं. - शिवरायांचे शिक्षण - ४ थी चे इतिहासाचे पुस्तक, पान क्र. १९] तो हिंदू धर्म वाईट कसा असू शकेल? ते रामायण-महाभारत चुकीचे कसे काय असू शकेल? त्याची शिकवण वाईट कशीकाय असू शकेल? whatsapp वर, बसल्या बसल्या काही काम नाही म्हणून तुमड्या लावायचं काम करणारे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, ई. राष्ट्रपुरुषांच्यापेक्षा अधिक हुशार आहेत काय?


हिंदू धर्मावर, देवतांवर सतत विखारी टीका करून या धर्मात खरोखर फार मोठ्या काहीतरी चुका आहेत, गडबड आहे असे भासवणार्यांनी याचा देखील विचार करावा, अंधश्रद्धा, लोककथा, आख्यायिका, चांगले वाईट लोक, देव आणि भुताच्या संकल्पना या बहुतांशी सर्व समाजातील लोकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात, आणि जी गोष्ट सर्वच ठिकाणी आहे, त्यामागे नक्कीच एकसमान मानसिकता असायला हवी, बरोबर ना?


अनेक श्रद्धांना आज अंधश्रद्धा म्हटलं जातं..प्रत्येक श्रद्धेचे आपल्याला कारण समजू शकत नाही, किंवा ज्या कारणासाठी ती श्रद्धा, लोक बाळगू लागले ती कारणे आता कालबाह्य झालीत, त्यामुळे उत्तरे मिळणे अशक्य आहे. पण आमच्यावर विखारी टीका करणारे लोक मात्र, क्रिकेट म्याच च्या वेळेस त्याच जागी, संडास-लघवी आवळून म्याच संपेपर्यंत बसून राहतात, याला काय म्हणावे? श्रद्धा/अंधश्रद्धा/ की दुटप्पीपणा? आज याच रंगाचा शर्ट घालणार, त्याच रंगाची प्यांट घालणार, गाडीला ३ पंजे असलेला नंबर पाहिजे, गाडीला १ एक्का असलेलाच नंबर पाहिजे .. हा प्रकार काय आहे? असे उद्योग करणार्यांनी श्रद्धा-अंधश्रद्धा या विषयावर बोलू नये! स्वतःच्या श्रद्धा आणि दुसऱ्यांच्या मात्र अंधश्रद्धा हा असला काहीतरी विचित्र प्रकार सध्या सुरु आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मुलन म्हणजे सरळ सरळ नास्तिकवादाचा प्रचार असादेखील चुकीचा अर्थ काढला जातो….


काही प्रमुख मुद्दे :

१. दत्तप्रभूंची कथा – दरवेळी दत्तजयंतीच्या दिवशी, अनुसयेच्या कथेची थट्टा केली जाते! आणि त्यावरून दत्तभक्तांची अक्कल काढली जाते .. पण थट्टा करणारे हे कसे काय विसरतात कि दत्तप्रभूंचे २४ गुरु आहेत : त्यांच्याकडून दत्तगुरु काय शिकतात ते पहा ..

पृथ्वी – सहनशीलता, वायू – विरक्ती, आकाश – अचलता, पाणी – स्नेहभाव, अग्नी – पवित्रता, चंद्र – विकारबाधा न होणे, सूर्य – निःपक्षपातीपणा, कपोत – अलिप्तता, अजगर – निर्भयता, समुद्र – परोपकारी, पतंग – मोहत्याग, मधमाशी – धनसंचय त्याग, हत्ती – कामविकार वश न होणे, भ्रमर – विषयात न अडकणे, मृग – मोहत्याग, मत्स्य – स्वादबद्ध न होणे, पिंगला – आशेचा त्याग, टिटवी – उपाधीचा त्याग, बालक – आनंदी, कंकण – एकांतवास साधणे, शरकर्ता – एकाग्रता, सर्प – सावधता, कोळी – ईश्वरेच्छा, पेशकार – ईश्वर स्वरूपता

अर्थात निसर्गालाच द्त्तप्रभूंनी गुरु मानले आहे! तर मग अशा देवतेची पूजा करणाऱ्यांना निसर्गाचे संवर्धन करण्याचा बेमालूम संदेश जर जात असेल तर यात वाईट काय आहे?


२. इंद्र – शूरवीर इंद्र ही आर्यांची देवता. पूर्वी युद्धावर जाताना इंद्राची पूजा केली जायची. पण हा इंद्र दाखवताना नेहमी स्वर्गात बसलेला, नाच गाण्याचा आस्वाद घेत असलेला आपण टीवी वर पाहिला. या देवाधिदेव इंद्राने, एका ऋषीपत्नीवर वाईट दृष्टी टाकली म्हणून, त्या ऋषींनी त्याला शाप दिला त्याला अनेक त्वचेचे रोग झाले, मग त्याने थेऊर या ठिकाणी महादेवाची १४ वर्षे तपश्चर्या केली आणि मग त्याला प्रायश्चीत्त मिळाले. या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो?

तर तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असाल तरीही परस्त्री वर वाईट दृष्टी टाकणे हा अक्षम्य गुन्हा आहे, इंद्राने जरी तो केला तरी त्याला शिक्षा झालीच..

[या देवतेची बदनामी करण्यात स्वतः हिंदू अग्रेसर आहेत! कायम इंद्र असाच दाखवला जातो. कायम रामलीला म्हणजे विनोदी प्रसंग म्हणूनच रंगवला जातो!]


३. गणपतीची पूजा - गणपती म्हणजे कोण? तर हत्ती! हत्तीचा मेंदू हा अतिशय तल्लख मानला जातो. शास्त्रीय दृष्टीकोनातून ज्या प्राण्याच्या मेंदूत सर्वात जास्त वळकुट्या असतात त्या प्राण्याची स्मरणशक्ती तेवढी जास्त चांगली असते, आणि म्हणून जर गणपतीला विद्येची देवता हा मान दिला असेल तर त्यात चूक काय? त्याचशिवाय हत्तीचा, दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात विविध कामांसाठी वापर केला जातो. आपली संस्कृती आहे, ज्या प्राण्यांचा आपल्याला फायदा होतो, किंवा ज्या प्राण्यांची आपल्याला  भिती वाटते, त्यांची आपण पूजा करतो! मग त्यात सर्वच आले, गाय, बैल, साप-नाग, वाघ इत्यादी.. मग अशा उपयोगी देवतांचा अजून कशा पद्धतीने वापर करता येईल?

- तर त्यांच्याबरोबरच अजून धर्माने/तत्वाने वागायचे संदेश दिले तर लोक त्याचं पालन अजून चांगल्या पद्धतीने करतील..


४. हिंदू धर्मातील असंख्य देव - महाराष्ट्रात बहुतांशी लोकांना, श्रीकृष्णापेक्षा त्याचं रूप, विठ्ठल जवळचा वाटतो, अगदी मलादेखील! गणपती,शंकर जवळचे वाटतात तर उत्तरेकडे श्रीकृष्ण पूजा मोठ्या प्रमाणात आहे. जी देवता त्या त्या समाजाला जवळची वाटते, तिच्या लोककथा, आख्यायिका तयार केल्या जातात/किंवा त्यांच्या पराक्रमाच्या शौर्य कथांचा आवर्जून प्रचार/प्रसार केला जातो. त्यामागे उद्देश एकच असतो, लोकांनी सौजन्याने, प्रेमाने आणि तत्वाने वागावे. बंगाल/इशान्य भारतात गेलात तर तिथे अजून वेगळ्या देवता आहेत. या कारणामुळे जर अनेक देवतांची निर्मिती झाली असेल तर त्यात काहीच वावगे वाटत नाही. उलट आज भारतात असलेल्या ‘सहिष्णू’ वातावरणामागे, या देवी-देवतांचा सिंहाचा वाटा आहे असे मी मानतो.


५. आपली संत-परंपरा - माझ्या माहितीप्रमाणे किमान ९० % संतांच्या आयुष्यात काहीना काही चमत्कार घडलेला आपण वाचतो. अनेकांना विट्ठलाने दर्शन देखील दिले. यात किती तथ्य आहे माहित नाही. पण मला असं वाटतं कि, संताना देखील कुठे तरी याची जाणीव होतीच, कि चमत्काराची मदत घेतल्या शिवाय आपण आपले विचार प्रभावीपणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही. त्यांनी कुठल्याही चमत्काराचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही तर समाजाचे प्रबोधन करण्यासाठीच केला. त्यामुळे त्यांनी देखील समाजाची मानसिकता ओळखली होती, हेच म्हणता येईल.. आणि असे चमत्कार फक्त आपल्याकडे घडले नाहीत तर जगात सर्वच ठिकाणी घडत आलेत..आजही घडतात...यापुढे देखील घडत राहतील! राजहंस बनून सुज्ञपणे त्यातील योग्य ते घ्यावे बाकी भाग सोडून द्यावा, एवढी साधी गोष्ट आहे.


ही केवळ ३-४ उदाहरणे दिली आहेत. अशा अनेक गोष्टी आपल्या पोथ्या-पुराणात, गोष्टीच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. तर अशा लोककथा, चमत्कार, का आले असावेत? त्याची मला उमजलेली काही कारणे.. देवाला लोकप्रिय बनवणे - अशा रंजक कथा, त्या त्या देवतेला जोडल्या गेल्या कि त्या देवतेची लोकप्रियता आपोआप वाढते. याचा फायदा काय?


१. याचा फायदा म्हणजे, त्या देवतेच्या माध्यमातूनच, त्या देवतेच्या चरीत्रामधूनच लोकांना तत्वाने वागायचा संदेश बेमालूमपणे दिला जातो, उदा. आता इंद्राला, ब्रह्म देवाला जर शाप मिळत असेल तर मी देखील तत्वाने वागले पाहिजे हा संदेश आपोआप मिळतो. एकदा देव आवडला त्याचं चरित्र आवडलं कि, देवाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याचा भक्त ऐकतोच. याचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा अशी आपल्या पूर्वजांची इच्छा असेल, किंबहुना होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

२. देव लोकप्रिय झालेकी, त्यांच्या नावाने जत्रा भरवल्या जातात, सण-समारंभ साजरे केले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते, लोकांना रोजगार मिळतो.

३. सणा समारंभाच्या वेळी लोक आपापसातले मतभेद विसरून एकत्र येतात, कामानिमित्त घरापासून लांब गेलेली मुलं पुन्हा घरी येतात..कुटुंब जोडली जातात ..

४. विविध पक्वान्ने बनवली जातात, रांगोळ्या काढल्या जातात, सजावट केली जाते, विविध कला गुणांना यातून चालना मिळते.  उदा. गणेशोत्सव-दहीहंडीच्या काळात अनेक लोकगीतांना मोठे व्यासपीठ मिळते...या सगळ्यातून जी सकारात्मक उर्जा निर्माण होते, तिला कोणी नाकारू शकते का?

असे एकना अनेक कितीतरी फायदेच आहेत..


बर, खरोखर हिंदू देवतांचा एवढाच तिटकारा असेल तर साडेतीन मुहूर्तावर, हिंदूंच्या सणांच्या दिवशी, हिंदू द्वेष्ट्यांनी काहीही खरेदी करू नये, कशाला मिळालेल्या भरगोस सुटीचा लाभ घेता? देव-धर्मच नसते तर हे सण-समारंभ देखील साजरे झाले नसते, आणि सण समारंभ नसते तर त्या त्या दिवशी, एम आर पी किंमतीत ५०-५० टक्के, नवीन गाड्या घ्यायच्या वेळेस, नवीन घर घेताना एखादा-अर्धा टक्का गृहकर्जात सूट कुठून मिळाली असती? आणि खरोखर हिंदू देवता एवढ्या झोंबत असतील, गणपती एवढा डोळ्यात खुपत असेल तर हे करूनच दाखवावे! हिंदू सणांच्या दिवशी खरेदीवर पूर्ण बहिष्कार! पूर्ण दुखवटा.. अगदी मिळालेली सुट्टी देखील कुठे तरी समाजकार्यासाठी वापरावी, नाहीतर ऑफिसात जाऊन काम करत बसावे! पहा!!! प्रयत्न करा!!! जमतंय का!!!


अगदी अलीकडे, whatsapp वर एक रावण-बिभीषणाची कथा खूप लोकप्रिय झाली आहे, त्यात २ भावांनी कसे एकीने राहिले पाहिजे हा संदेश दिलेला आहे. फक्त ५ ओळींची कथा असून, एकीचे बळ हा संदेश देणारी ही एक उत्कृष्ट कथा आहे, पण रावण आणि बिभीषणाच्या जागी जर, दुसरी पात्र असती तर? तर ही कथा प्रभावी वाटली असती का? खरोखर असे काही घडले होते का? मी तर ऐकले नाही पण अशाच पद्धतीने लोककथा बनवल्या जात असाव्यात किंवा बनवल्या गेल्यात! मग आज याचे माध्यम whatsapp/सोशल मिडीया आहे तर पूर्वीच्या काळी पोथ्यापुराणे, चावडीवरच्या चर्चा, लोकनाट्य हे माध्यम असेल, आणि त्यातूनच पिढी दर पिढी, ही लोककथांची, अनुभवांची शिदोरी आपल्यापर्यंत आलेली आहे.


जसे हाताची पाचही बोटे सारखी नसतात तसेच समाजातील सर्व लोक एकाच पद्धतीने विचार करत नाहीत. देशातल्या कायद्यासारखाच आजही अनेकांना देव आणि धर्म मोठा वाटतो. 'इथल्या कोर्टात वाचशील रे पण वरती जाऊन काय तोंड दाखवशील!' असे संवाद आपल्याला उगाच ऐकायला मिळत नाहीत..अनेकजण देव-धर्म, पोथ्या-पुराणे यांना आदर्श मानून त्यांचं जीवन जगतात तर अनेक जण, आमुक गोष्ट बेकायदेशीर आहे म्हणून देखील तिच्यापासून लांब राहतात, तर असेही असतात ज्यांना यापैकी कशाचीच गरज वाटत नाही, सद्सद्विवेक बुद्धीला जे पटतं तेच करत असतात. त्यामुळे जसे कायदे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे देव धर्म देखील महत्वाचे आहेत. 

भागवत पुराणातील पहिल्याच पानावर स्पष्ट शब्दात लिहिले आहे, "ज्यांचे जीवन उल्लेखनीय कार्यामुळे उपदेश करण्यास योग्य, उद्बोधक आहे वा ज्यांचा जीवनकाल विशिष्ट आदर्शाला प्राधान्य देणारे आहे. अशाच राजांच्या जीवन चरित्राचा व कार्याचा यामध्ये समावेश केला आहे." उगाच वेळ जात नाही, किंवा पुस्तकाची पानं भरायची आहेत म्हणून त्यांनी पुराण लिहिलेले नाही.

१२५ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाला हाताळण एकट्या धर्माला किंवा एकट्या कायद्याला शक्य नाही, कारण या सर्व गोष्टी आज असून देखील असंख्य गुन्हे घडतात. या देशाचा रथ, देव-धर्म आणि कायदा, अशा २ चाकांवर विकसित, प्रगत राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करतो आहे, यातून कोणतेही एक चाक काढले तर, रथाचे मोठे नुकसान होईल.


मला हिंदू असल्याचा नितांत अभिमान आहे, आणि का नसावा? नेहमीच काळाप्रमाणे या धर्माने स्वतःला बदलले आहे. माझ्या धर्मातला कर्मठपणा पाहणार्यांनी माझ्या धर्मातली लवचिकता कधीच पाहिली नाही हे दुर्दैव! आज गणेश विसर्जनाला तळी, नद्या, शोधण्यापेक्षा आम्ही बादलीत गणेश विसर्जन करतो, आणि पाणी झाडांना वाहतो.....यासाठी माझा धर्म माझ्यावर कसलाच आक्षेप घेत नाही, ज्या स्त्रियांना वटपौर्णिमेला, वडाच्या झाडापर्यंत जाणे शक्य नाही, त्यांना वडाच्या फांदीची पूजा करण्याचे स्वातंत्र्य देखील माझा धर्म देतो, मी कर्मयोग मानावा, कि भक्तियोग मानावा, कि दोन्हींचा संतुलितपणे अंगीकार करावा, यावर माझा धर्म कसलीच बंधने घालत नाही. जगात जे जे चांगले आहे त्याचा स्वीकार करणे म्हणजेच हिंदू असणे होय. ‘आनो भद्रा कृत्वा यान्तु विश्वतः’ ऋग्वेदातील या मंत्राचा अर्थ आहे, की जगातले सगळे चांगले विचार माझ्यापर्यंत कोणत्याही दिशेने येऊदेत! हीच शिकवण मला मिळाली, आणि हीच शिकवण मी माझ्या मुलांना देणार आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः या उक्तीचा अर्थच असा आहे की, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, तिला तिचे विचार स्वातंत्र्य आहे. मला कुणी परधर्मीय मित्र त्यांच्या देवाचा प्रसाद द्यायला येतो, तेव्हा माझ्या धर्माला हे चालत नाही, असं मी कधीच म्हणत नाही, उलट त्याच्या आनंदात मी सामील होतो, माझा धर्म माझ्यासाठी कसलीच आडकाठी करत नाही. फुटपट्टी घेऊन माझ्या धर्माचं मूल्यमापन होऊ शकणार नाही. माझा धर्म विशाल आहे. मला माझ्या धर्मात जे स्वातंत्र्य मिळते त्यासाठी मी माझ्या पूर्वजांचे, आणि सर्वच समाजसुधारकांचे आभार मानतो.


शेवटी व्यक्तीस्वातंत्र्य आहे! ज्याची त्याची इच्छा, त्याचा त्याला निर्णय घेऊ द्या की! देव मानायचा, नाही मानायचा, पुराणातल्या गोष्टी मानायच्या नाही मानायच्या. आजच्या बहुतांशी हिंदू समाजाची भूमिका, योग्य वाटते. मंदिरात ते सकारात्मक उर्जा मिळवण्यासाठी जातात, पुराणातून काय घ्यायचं आहे काय सोडायचं आहे, आणि काय खोडायच आहे, याची या समाजाला चांगली समज आहे. आता त्यांचा बुद्धीभेद कोणीही करू नये! विचारवंतांचे वेगवेगळे क्लास आहेत! कोणी देवतांच्या मूर्तींवर मुतायची भाषा करतो, तर कोणी देवी देवतांना चरसी, बाईलवेडा म्हणतो, कोणी नम्र नास्तिक असतो, तर कोणी सुज्ञ आस्तिक असतो, अगदी त्याचप्रमाणे, या विचारवंतांवर टीका करणाऱ्यांचा देखील वेगवेगळा क्लास आहे!(जे आपण पद्धतशीर पणे दुर्लक्षित करतो),


आजच्या घडीला सो कॉल्ड, बुद्धिवाद्यांनी, सोशल मिडीयावरील पंडितांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची गरज आहे, ती म्हणजे आपण अंधश्रद्धांवर चिकित्सा करताना कुठेही लोकभावनेला तडा जाऊ नये, कुठे ही देवी-देवतांवर अभद्र टीका होऊ नये, आणि एखाद्या धर्म-जातीच्या द्वेष्ट्यांना दुसऱ्या धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध बोलायला देखील भांडवल मिळू नये. केवळ अंधश्रद्धेला टार्गेट करावे, श्रद्धेला नको!